बापट तापट ‘अ’बापट आणि चापट
यंदाच्या गणपती पूर्वी विद्यानंद बापट या व्यक्तिने महापालिकेच्या सभेत प्रत्यक्ष जाऊन डीजे ला विरोध केला. हे म्हणजे अतिच झालं. हल्ली आम्ही पोस्ट लाईक करून, स्टेटस ठेवून, रीळ बनवून, विरोध करतो. हे तर प्रत्यक्षात गेले आणि मागणी केली थेट डीजे बंद करा. आवाजाची पातळी,मर्यादा वगैरे वगैरे असं काही नाही. थेट डीजे बंद. पुढची मागणी ऐकून तर मजया डोळ्यातच पाणी आल. बडव बडव बडवून ढोल ताश्या वाजवण पण बंद करा म्हणून मागणी केली. त्याला तर रणवाद्ये वगैरे म्हंटले. ऐकूनच हसू आल आणि चित्रपटातल दृश्यच समोर येऊन गेलो. खो खो हसलो. काय म्हणायच या बापटांना.
आमच्या लहानपणी, गावी, हा ताश्या वाजवायला एका विशिष्ट जातीचा माणूस असायचा. शाळेत MCC पथकात, ढोल ताशा पथक असायचं. आम्हाला म्हणजे आम्हा मुलांना ते झांज पथकात जायला नको नको वाटायचं. थोडा कमीपणच वाटायचा. तर ह्या गणेश उत्सवाच आणि ढोल ताश्याच काय गणित कळलच नाही. टोळकच्या टोळक जमून, बडव बडव ढोल बडवायचे. असो, मला संगीत कळत नाही म्हणून हे संगीत समजत नाही. तर हे बापट त्यालाही विरोध करतात.
बापट तापट आहेत आस मी एका मित्राला म्हणालो. हे विद्यानंद बापट पैकी ‘बापट’ चांगलेच प्रसिद्ध झाले. त्यात त्यांची मराठी ही त्यांना प्रसिद्धी मिळण्यात कामी आली. त्यांची मराठी लोकांना वेगळी वाटली, आवडली, त्यामुळे ते चांगलेच पसरले. कारण लोक रोज रोज टीव्ही वर राजकारण्यांच मराठी ऐकून विटले होते. सभा म्हणा किंवा पत्रकार परिषदा म्हणा ऐकतानाच वीट येतो. यूट्यूब च्या शॉर्ट्स वर आले तर कधी एकदा पुढे ढकलतोय अस होत. एवढं गळा काढून यांचं बोलणं. त्यामुळे बापटांच्या मराठीचा त्यांना फायदाच झाला. नाहीतर त्यांची मागणी आणि ते दोघेही दुर्लक्षितच राहिले असते.
बापटांच ‘बापट’ असण किती महत्वाच हे पण लक्षात घ्यायला हव. बापट ज्या तापट वातावरणात डीजे बंद ची मागणी करत आहेत त्या वातावरणात ‘बापट’ असण सोईच आहे.
हे जर ‘अ’बापट असते तर आत्तापर्यंत त्यांना धर्मद्रोही, देशद्रोही, पाकिस्तानी म्हणून त्यांना तुडवल असत. आतंकवादी संघटना त्यांच्या दारावर गेल्या असत्या आणि हे सगळं करण्यात ईतर ‘अ’बापट पुढे असते. तरीही त्यातल्या त्यात एक आलाच आणि दिली बापटांना चापट. खरी तर ती चापट कायदा सुव्यवस्थेला होती.
डीजे बंदीची मागणी करणारे ‘अ’बापट असते तर त्यांच्याभोवती कमी कॅमेरे असते. ते एवढे प्रसिद्ध नसते. जरी ते ‘अ’बापट अस्खलित मराठी बोलत असते तरी त्यांना हिणवल असत, गुटखा थुंकून बोल म्हंटलं असते, हल्लीची नवी टूम GenZ ला मराठी पासून तोडणारी मराठी बोलणारा म्हंटले असते.
त्यामुळे तापट दिसत असलेले बापट हे ‘बापट’ असणे यावेळी जुळून आले. आणि शेवटी बापटांना ‘अ’बापटांची चापट बसली.
चेतन.